मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते झाडावर चढून बसले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे तीन कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून बसले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल चार तासानंतर लेखी आश्वासन घेऊनच ते झाडावरुन उतरले.

आरक्षणप्रश्नी ठोस निर्णय सरकार घेत असल्याचे दिसत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकत्र्यांनी हे आंदोलन केले. किशोर गिराम, अविनाश पवार व संदीप कदम अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, हे तिघे सकाळी ८ वाजता आरक्षणप्रश्नी झाडावर चढून बसले होते. अर्ध्या तासानंतर माहिती मिळाल्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांना झाडावरुन खाली उतरण्याची विनंती करण्यात आली.मात्र, ते एकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांना या आंदोलनाबाबत कळविले. यावेळी आरक्षणप्रश्नी घोषणाबाजी करण्यात आली. अशोक हिंगे, बी.बी. जाधव, गणेश उगले, विनोद इंगोले, राहुल वाईकर, अशोक सुखवसे, मळीराम यादव, प्रा. पंडित तुपे, मुकुंद गोरे, प्रकाश काळे, विजयकुमार लाटे आदी उपस्थित होते.

झाडावरुन खाली उतरल्यावर शिवाजीनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक बिपीन शेवाळे, फौजदार रफियोद्दीन शेख यांनी तिनही आंदोलनकत्र्यांना ताब्यात घेतले. त्यांना शिवाजीनगर ठाण्यात नेऊन त्यांच्यावर बेकायदेशीर आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर तिघांचीही सुटका करण्यात आली. १ डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा, त्याआधी आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेली आहे.