‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला धडकून बाइकस्वाराचा मृत्यू 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री झरीन खान हिच्या कारला धडकून एका बाईकस्वारचा मृत्यू झाल्याची घटना गोव्यात घडली आहे. गोव्यात अंजुना भागात झरीनची कार रस्त्याच्या कडेला उभी असताना संबंधीत २० वर्षीय बाईकस्वार हा झरीनच्या कारला येऊन धडकला. या तरुणाने हेल्मेट ही घातलेले नव्हते. त्यामुळे  त्याचा  हलगर्जीपणा त्याच्या जीवावर बेतल्याची चर्चा आहे. या अपघातात झरीन ही जखमी झाली आहे.
बाईकची कारला धडक झाल्याने बाईकस्वारचे रस्त्याच्या दुभाजकावर डोकं आपटले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या नंतर त्याला तात्काळ रुग्णालय नेण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना काळ संध्याकाळी गोव्यात घडली.
मॅनेजरशी वादामुळे झरिन चर्चेत –
काही दिवसापूर्वीच झरीनने तिच्या माजी मॅनेजर अंजली विरोधात तक्रार केली होती. अंजली अथाने  झरीनसोबत तीन ते चार महिने काम केले होते. यादरम्यान पैशाच्या व्यवहारावरून दोघींमध्ये वाद झाला होता. या प्रकरणासंदर्भात दोघींही मॅसेजद्वारे एकमेकींशी बोलल्या आणि याचदरम्यान अंजलीने  झरीनला आक्षेपार्ह मॅसेज पाठवले. अंजली अथा हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत मॅनेजर म्हणून काम केले आहे.
झरीनने सलमान खान सोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने हाऊसफुल्ल २, हेट स्टोरी ३ सारख्या चित्रपटात काम केले आहे.