विविध मागण्यांसाठी वकिलांचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विविध मागण्यांसाठी ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी वकिलांचे आंदोलन होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी , न्यायालय प्रशासन यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि १२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत आगस्ते यांनी पत्रकार परिषदेत पुणे बार असोसिएशन तर्फे आंदोलनातील सहभागाविषयी माहिती दिली. बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकिलांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्याविषयीच्या सूचना विविध राज्यातील बार कौन्सिलला दिल्या आहे. त्यानुसार ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन होईल.

देशातील प्रत्येक न्यायालयात बार असोसिएशन करता स्वतंत्र इमारत, वकिलांना बसण्यासाठी जागा, स्वच्छतागृहांची व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वकील आणि पक्षकार यांच्या कल्याणकारी योजनेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, नवोदित वकिलांना पहिले पाच वर्ष दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, वकिलांच्या निवासस्थानाकरिता कमी मोबदल्यात जागा उपलब्ध करून द्यावी, लीगल सर्विसेस अथोरिटी अॅक्ट मध्ये सुधारणा कराव्या अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे. उपाध्यक्ष सतिष देशमुख यांनी याबाबतचे पत्र सर्व राज्यातील बार कौन्सिलला पाठवले आहे. पुणे बार असोसिएशन तर्फे ११ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सभा होईल त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, तहसीलदार आदींना निवेदन देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी पदाधिकारी आणि वकील वर्ग मुंबई येथे आझाद मैदानावर जमणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतील.