Budget 2021 : LIC विकण्याच्या घोषणेने सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प संसदेत सादर केला. दरम्यान राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, विविध करांच्या माध्यमातून महाराष्ट्र लाखो करोडो रुपयांची केंद्रावर उधळण करतो. पण त्या बदल्यात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे.

तसेच वर्षानुवर्षे सर्वसामान्यांसाठी सुरक्षित गुंतवणूकीचे माध्यम असलेली एलआयसी विकण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केल्याने सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. शेख म्हणाले की, कोरोना महामारीतून आता कुठे देश सावरत असताना सर्वसामांन्यांसाठी काही दिलासादायक निर्णयांची अपेक्षा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली जात होती.

पण दिलासा देण तर दूरच राहिल देशाची संपत्ती खाजगी कंपन्यांना विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणूका आहेत त्या राज्यांतील जनतेला खुश करण्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी अर्थसंकल्पात केल्याने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहिरनाम्याच स्वरुप प्राप्त झाल्याचे शेख यांनी सांगितले.