‘गांजानंतर आता गोव्यात आत्मनिर्भर मटका’ !

मडगाव : वृत्तसंस्था – औषधी वापराच्या नावावर गोव्यात गांजाची लागवड अधिकृतरित्या करण्यासाठी प्रस्ताव ठेवणारे प्रमोद सावंत यांचे भाजप सरकार आता नवीन वर्षी गोव्यात नवीन मटका सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा घणाघाती आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward President Vijay Sardesai) यांनी मंगळवारी (दि. 29) एका व्हिडिओ संदेशाद्वारे केला आहे.

सरदेसाई म्हणाले की, यापूर्वीच मुख्यमंत्री सावंत यांच्या बरोबर मटका सुरु करणा-या व्यावसायिकांची बैठकही झाली आहे. गोव्यात सध्या चालू असलेला मटका पूर्णपणे बंद करून हा नवीन सरकार पुरस्कृत मटका सुरु केला जाणार आहे. सरदेसाई यांनी भाजप सरकारने गोव्यात गांजाची लागवड अधिकृतपणे सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाची फाईल पुढे केल्याचा आरोप केला होता. मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशी फाईल जरी पुढे आणली असली तरी अजून तो निर्णय घेतला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपने गोवा विकायला काढला आहे. सरकारचा कारभार पाहिल्यास त्यांना गोवा हे विकृतीचे केंद्र बनविण्याचे आहे. गोवा हे व्यसनांचे केंद्रस्थान आम्हाला बनवू द्यायचे नसल्यास आता या सरकारचे हे असले इरादे नेस्तनाबूत करण्यासाठी ‘टीम गोवा’ या संकल्पनेखाली सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारला अडविण्यासाठी दक्ष विरोधकांची गरज असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. आपल्या ‘ सेव्ह गोवा नाऊ’ या संकल्पनेचा उल्लेख करताना गोवा वाचविण्यासाठी आम्हाला आताच प्रयत्न करावे लागतील अन्यथा वेळ हातची निघून जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने हट्ट सोडावा, विद्यार्थ्यांचा परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात : सरदेसाई
विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. त्याबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, अजूनही कोविडची भीती गेलेली नाही. ब्रिटन मधून आलेल्या लोकांच्या ज्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत. ते झटपट मिळावेत यासाठी सरकारकडे कसलीही यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन परीक्षा घेणे हाच एकमेव पर्याय आहे. जर सरकारने आपला हट्ट न सोडून विद्यार्थ्यांचा जीव जर धोक्यात घातला तर या सरकारला धडा शिकविण्यासाठी हे विद्यार्थीच पुढे येतील हे लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.