बीड : डॉक्टर जावयानं दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सासूने गळफास घेत केली आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी शहरात आठवडाभरापूर्वी सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे (वय ६०) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आता या आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. डॉक्टर जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सुशीला यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी शनिवारी मुलगी नमिता अमोल रकटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परळी पोलीस ठाण्यात डॉक्टर जावयासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती डॉक्टर अमोल शरणआप्पा रकटे, सासू जयश्री शरणआप्पा रकटे, सासरा शरणआप्पा विश्वनाथआप्पा रकटे, नणंद श्रूती शरणआप्पा रकटे अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील डॉक्टर अमोल रकटे यांच्याशी नमिता यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी नमिता आणि तिच्या कुटूंबियांना अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली. लग्नात चुकीची माहिती देत दिशाभूल केली म्हणून नमिताची आई सुशीला यांचा सतत अपमान केला. दरम्यान, लग्नात दिलेलं स्त्रीधन तळतळाट लावून दिल असून आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे. असा आरोप केला. त्याचबरोबर दोन लाख रुपये आणि एक सोन्याची अंगठी देण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली. तसेच सुशीला, त्यांचे पती आणि मुलाला डॉ अमोल यांच्या पाया पडण्यास भाग पडल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून नमिताला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू होता. मुलीला होणार त्रास आणि जावयान केलेला अपमान जिव्हारी लागल्याने सासू सुशीला यांनी गळफास घेऊन स्वतः ला संपवले असेही नमिता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.