चित्रपटातून उलगडणार सरसेनापती ‘हंबीरराव मोहिते’ यांचा जीवनप्रवास

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपत्री शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या स्वराज्याच्या सैन्याची धुरा खंबीरपणाने सांभाळणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

‘तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ….’ अशी टॅगलाइन असलेले पोस्टर प्रविण तरडे यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केलं होत. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या या पोस्टरवरून तरी चित्रपट भव्य दिव्य असेल अशी शक्यता आहे. चित्रपटासाठीच्या लोकेशन पाहणीला व ड्रोन शुटिंगला सुरूवात झाली आहे.

‘मुळशी पॅटर्न’ च्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे आता कोणता चित्रपट घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे करणार आहेत.