क्राईम पेट्रोल मालिका पाहून खूनाचा रचला कट; प्रेमात अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील क्राइम पेट्रोल (crime patrol) मालिका पाहून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात उघडकीस आली आहे. गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करुन गिट्टीखदान पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली आहे.

राकेश डेकोटे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी राजश्री राकेश डेकोटे व तिचा प्रियकर रजत शामराव सोमकुवर यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजत हा फिटिंगचे काम करतो. गेल्या 6 वर्षांपासून आरोपी राजश्री आणि रजतचे प्रेमसंबंध होते. पण, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध राजश्री हिचे लग्न राकेश डेकाटे यांच्यासोबत झाले होते. त्यांना चार वर्षांचा वैष्णव नावाचा मुलगा आहे. लग्नानंतरही आरोपी महिलेचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यामुळे पतीला संपवायचा कट तिने रचला.

माहेरी कार्यक्रम असल्याचे राजश्रीने पती राकेशला सांगितले व मंगळवारी सकाळी राजश्रीही पती राकेश व मुलासह धापेवडा येथे गेली. दुपारी ती आपल्या प्रियकराला भेटली व सगळा कट रचला. त्यानंतर रात्री आरोपी महिला तिचा पती आणि मुलगा दुचाकीवरून येत असताना मुलाला उलटी येत असल्याचे सांगून दुचाकी थांबवायला सांगितली. राजश्री वैष्णवला रस्त्याच्या बाजूला घेऊन गेली. नेमके त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधून रजत दुचाकीवरुन आला. त्याने आधी दिखावा म्हणून राजश्रीला लोखंडी रॉड मारला. आपल्या पत्नीवर हल्ला झाला म्हणून रजत मदतीसाठी धावून आला असता आरोपीने त्याच्यावर चाकूने सपासप वार करून पसार झाला. हल्ल्यानंतर घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. जखमी अवस्थेत राकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी राजश्रीच्या मोबाईलची पाहणी केली असता मोबाईलमध्ये रजत यांचे छायाचित्र दिसले, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली. अन राजश्रीऩे खून केल्याचे कबुल केले.

मोबाईलवरील call history तपासली अन् सगळा प्रकार समोर आला
पोलिसांनी राजश्रीची मोबाईल फोनवरील कॉल हिस्ट्री तपासली, त्यावरून सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी राजश्रीची उलटतपासणी केली असता सुरुवातील तिने उडवाउडवीची उत्तर दिली. पण, पोलिसांनी बळाचा वापर केला असता तिने हत्येची कबुली दिली. तिच्या माहितीवरून आरोपी रजतला अटक केली आहे. दोघांनीही क्राइम पेट्रोल मालिका पाहून हत्येचा कट रचला होता, अशी कबुलीही दिली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.