महिनाभर काम करुन मिळाला फक्त ६ रुपये पगार

आग्रा : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कारखान्यात महिनाभर काम केल्यानंतर मालकाने एका तरुणाला केवळ सहा रुपये पगार दिला. त्यामुळे निराश झालेल्या तरुणाने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने इतर कामगारांच्या वेळीच लक्षात आल्याने  त्याचे प्राण वाचविले.

सिकंदरामधील एका चप्पल कारखान्यात ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात अनेक चामड्याच्या कारखान्यात धोकादायक स्थितीत कामगारांना काम करावे लागते. मालक या कामगारांची अतिशय पिळवणूक करत असल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी उघड झाली आहेत. या कारखान्यांतून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असल्याचा तक्रारीही सातत्याने येत असतात. असे असताना मोठा नफा कमविणारे हे मालक आपल्या कामगारांना काय वागणूक देतात. त्याची कशी पिळवणूक करतात, याचे आणखी एक उदाहरण जगासमोर आले आहे.

[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3592fe9d-a753-11e8-8507-e9d7d9938048′]

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण कारखान्यात अनेक वर्ष काम करत होता. अनेक दिवसांपासून तो तणावाखाली होता. २७ जुलैला त्याचा अपघात झाला होता. उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या उपचारांचा खर्च कारखान्याच्या मालकाकडून करण्यात आला. तब्येत सुधारल्यानंतर तरुण कारखान्यात कामावर परतला. यावेळी त्याने आपला पगार मागितल्यानंतर मालकाने त्याला केवळ सहा रुपये दिले. त्यावर त्याने आपल्या उपचाराचा खर्च हप्त्या हप्त्यांमध्ये घ्यावी अशी विनंती या तरुणाने मालकाकडे केली. पण, मालकाने त्याला जुमानले नाही. तरुणाने अनेक वेळा मालकाला विनवणी केली की, मी घरखर्च कसा भागवू पण तरीही मालकाच्या ह्दयावर त्याचा काही परिणाम झाला नाही की आपण सर्व पगार कापून घेतला तर हा कामगार महिनाभर काय खाईल, याचा विचार त्याने केला नाही.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तरुण खूप तणावात होता़ बुधवारी तो कारखान्यात आला व त्याने सिलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. त्याचवेळी कारखान्यात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले. त्यांनी तातडीने हालचाल करुन त्याला खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये नेले. त्याची प्रकृती आता सुधारली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

तरुणाच्या या कृत्याने सर्व कामगार संतप्त झाले. त्यांनी पोलिसांना मालकावर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण आता आपल्या अंगाशी येत असल्याचे पाहून मालकाने उपचाराचा खर्च हप्त्याने घेण्यास तयारी दर्शविली. त्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.