अभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  लॉकडाऊनंतर सिनेसृष्टीतील काम पुन्हा सुरू करण्यात आलं असलं तरी अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. मालिकांच्या शूटिंग दरम्यान अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. निवेदिता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.पण निवेदिता यांना कसलीही लक्षणं जाणवत नसल्यानं त्या घरीच क्वारंटाइन झाल्या आहेत.

निवेदिता यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच सेटवरी इतर कलाकारांची देखील कोव्हिड चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या मुख्य कलाकारांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. निवेदिता या पूर्ण बऱ्या झाल्यानंतरच त्या मालिकेच्या शूटिंगमध्ये सहभागी होतील, मात्र २ दिवसांनी मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होईल असे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.

याच दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनाची बातमी समजताच रसिकांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर खंत आणि संताप व्यक्त केला जात आहे. एका संवेदनशील उत्कृष्ट कलाकाराचा असा कोरोनामुळे शेवट अनपेक्षित असल्याची भावनाही अनेकांकडून मांडण्यात आली आहे. ज्येष्ठ कलाकारांनी खरोखरच एवढा धोका पत्करण्याची गरज आहे का, असाही प्रश्नही लोकांकडून विचारला जात आहे.