#Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘3 डी त्रिकोणासन’चे ट्विट ; ‘योग’ दिवसाच्या तयारीचे दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. मोदी यांनी योगामुळे होणाऱ्या फायद्यांकडे लक्ष वेधत योगासन करतानाच एक व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांचे व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केले होते.

नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘२१ जूनला आपण योग दिवस २०१९ साजरा करणार आहोत. योग हा तुमच्या जीवनाचा अभिन्न भाग असला पाहिजे तसेच सर्वांनी योग करायला इतरांना प्रेरित करण्याचे आव्हान मी करतोय. योगाचे फायदे खूप आहेत. यामध्ये त्रिकोनासनचा एक व्हिडीओ आहे’.

भारत सरकारने दिल्ली, शिमला, म्हैसूर, अहमदाबाद आणि रांची या शहरांची निवड आंतराष्ट्रीय योग दिवसाचे कार्यक्रम घेण्यासाठी केली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा सरकारचा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम असेल.

गेल्यावेळेस प्रमाणे या ही वेळेस नरेंद्र मोदी स्वतः योगासन करताना पहायला मिळतील. या वर्षी ते झारखंडची राजधानी रांची येथे जातील. अशी माहिती झारखंडच्या मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. त्यांनी सांगितले की, २०१९ च्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम रांची येथे आयोजित करण्यात येईल. रांचीच्या प्रभात तारा मैदानात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. गेल्या वर्षी उत्तराखंडच्या डेहराडून येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

काय आहे योग दिवस ?

२१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी प्रस्ताव युनोमध्ये मांडला.

प्रधानमंत्री मोदी यांनी मांडलेला प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला. लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती’ अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले. सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. “आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती. ११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली.

You might also like