अहमदनगर : ‘त्या’ अधिकार्‍याच्या मनमानीविरुद्ध स्पर्धांवर बहिष्काराचा ‘इशारा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांनी क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटनांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे. त्यांची तातडीने बदली करावी. तसेच शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना दिला आहे.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनील जाधव, भाऊसाहेब रोहोकले, महेंद्र हिंगे, संजय भुसारी, शिरीष टेकाडे, रमाकांत दरेकर आदी उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचे क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांशी वागणे व बोलणे अवमानकारक आहे. त्यांची बदली न झाल्यास ७ दिवसानंतर जिल्हा क्रीडा कार्यालयास कुलूप लावण्याचा तर ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला आहे. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हा क्रीडा अधिकारी, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राष्ट्रीय क्रीडा दिन काळा दिन म्हणून पाळण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

जाणीवपूर्वक निधीत केली कपात

स्पर्धा आयोजनासाठी प्रत्येक खेळासाठी किमान १० हजार रुपये निधीची तरतूद असताना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी जाणीवपूर्वक ५० टक्के निधी कपात केला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त