स्वातंत्र्यदिनी ट्रॅकमनची रेल्वेखाली आत्महत्या, संतप्त कर्मचाऱ्यांचा रेल रोको 

अहमदनगर :पोलीसनामा ऑनलाईन

आज  देशभर  सवातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना अहमदनगर येथील रेल्वे खात्यात काम करणाऱ्या ट्रॅकमनने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील वाम्बोरी रेल्वे स्थानकाजवळ आज (बुधवार) सकाळच्या सुमारास घडली. बबलू कुमार असे या ट्रॅकमनचे नाव असून तो मुळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी  की,  गेल्या दीड वर्षांपासून अधिकारी सुट्टी देत नसल्याच्या कारणावरून ट्रॅकमनने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे  बबलू कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइलवर व्हिडिओ तयार केला असून मागील दीड वर्षांपासून आपल्याला  वरिष्ठ अधिकारी सुटी देत नसल्याने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते.

वाम्बोरी हे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गत येते. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी याठिकाणी  धाव घेतली आहे. दरम्यान, घटनास्थळी गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते. संतप्त कर्मचाऱ्यांनी म्हैसूर-वाराणसी एक्स्प्रेस रोखून धरली आहे. कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न रेल्वे अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्याचबरोबर बबलू कुमार सुटी मंजूर केली होती, असे स्पष्टीकरणही दिले आहे.
[amazon_link asins=’B06ZZB71TB,B0716MD8MP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c897b31-a078-11e8-ae3f-63b27859d978′]

अधिक माहिती अशी, बबलू कुमार हा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात २८ फेब्रुवारी २०१६ ला ट्रॅकमन म्हणून रूजू झाला होता. तो वाम्बोरी रेल्वे स्थानकाच्या यूनिट क्रमांक १८ येथे तैनात होता. त्याने मंगळवारी २८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत अशी १० दिवसांची सुटी मागितली होती. आपल्याला सुटी न देता अपमान करून हाकलून देण्यात आल्याचे बबलू कुमारने व्हिडिओत म्हटले होते. एप्रिल २०१७ पासून मला रजा दिलेली नाही. जेव्हा मी रजा मागायला जातो तेव्हा मला अपमान करून, शिवीगाळ करून परत पाठवले जाते. गेल्या दीड वर्षांपासून मी माझ्या कुटुंबीयांपासून दूर आहे. अशी नोकरी करून उपयोग काय, असा सवाल त्याने व्हिडिओत केला आहे. व्हिडिओत त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझा हा व्हिडिओ रेल्वेमंत्री आणि रेल्वेच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचवा. काम करूनही आमच्यावर कशा प्रकारे अन्याय केला जातो, हे त्यांना माहीत व्हावं, असे त्याने व्हिडिओत म्हटले होते.