अजित पवार अन् जयंत पाटील उद्या पंढरपूरमध्ये; नाराज कार्यकर्त्यांना दादा कोणता कानमंत्र देणार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. नाराज कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उद्या राष्ट्रवादीने बडे नेते पंढरपुरात येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे उद्या पंढरपुरात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची ते भेट घेवून उमेदवारी बाबत चर्चा करतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आज दिली. उद्या बैठकीत नाराज कार्यकर्त्यांना अजित पवार कोणता कानमंत्र देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये फूट पडू नये यासाठी नाराज कार्यकर्त्यांचे बंड थंड करण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून अजित पवार व जयंत पाटील हे उद्या सकाळी पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. सकाळी 10 वाजता मतदार संघातील कार्यकर्त्यांशी ते चर्चा करतील. नाराज कार्यकर्त्यांशी ते बंद खोलीत स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.

भारत भालके यांचे पुत्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर उमेदवारीचा ही मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी अंतर्गत कार्यकर्त्यांची धूसफुस चव्हाटयावर आली आहे.