‘बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का ?’ – अजित पवार

पोलीसनामा ऑनलाईनः कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 72 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यावेळी तुम्हाला आठवण झाली नाही. बाहेरच्या सेलिब्रिटीनी ट्विट केल्यावरच तुम्हाला जाग आली का, जगात कुठेही माणुसकीला अडचणीत आणणारी गोष्ट घडली की आपणही ट्विट करतोच. अशा घटनांविरोधात आपणही आवाज उठवतो. त्यांनीसुद्धा तेच केले आहे. पण इतक्या दिवसांपासून शेतकरी थंडी-वाऱ्यात आंदोलनाला बसले आहेत, हे आतापर्यंत इथल्या सेलिब्रिटींना दिसल नाही का, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बॉलिवूडकरांना केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकरी आंदोलनाबाबत विधान केले आहे. विख्यात अमेरिकी पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ट्विटरवर सेलिब्रिटींची ट्विटची मालिकाच सुरू झाली. ग्लोबल सेलिब्रिटींच्या विरोधात बॉलिवूड सेलिब्रिटी असे दोन गट ट्विटरवर तयार झाले. या सर्व घटनेवर उपमुख्यमंत्री पवारांनी विधान केले आहे.

रिहाना, ग्रेटा, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांच्यासह अनेक नामवंतांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अमेरिकेने प्रथमच भाष्य केले. शांततापूर्ण आंदोलन आणि इंटरनेट वापराचा अधिकार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे असून ते सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे संवादातून तोडगा काढावा, असा सल्ला अमेरिकेने भारताला दिला. तर भारताने केलेले 3 नवे कृषी कायदे हे सुधारणांसाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.