अकाेला : काँक्रीट रस्त्यांची कामे असमाधानकारक चाचणी अहवालातून स्पष्ट

अकोला- पाेलीसनामा ऑनलाईन- शहरातील  मुलभूत सोयी सुविधांच्या विकास कामातंर्गत शासनाकडून प्राप्त वैशिष्टयपूर्ण निधीतून अकोला शहरातील सहा मुख्य रस्त्यांचे करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाचे काम असमाधानकारक असल्याचे आज सार्वजनिक करण्यात आलेल्या चाचणी अहवालातून समोर आले आहे. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, अकोला येथील पाटबंधारे विभागाचा गुण नियंत्रण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळाने सदर रस्त्यांच्या नमुन्यांची तपासणी करुन काँक्रीट कोअरचा चाचणी अहवाल प्रशासनाकडे सादर केला होता.

नियोजन भवनात आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शहरातील रस्त्यांचे करण्यात आलेल्या सोशल / तांत्रिक ऑडिटच्या चाचणी अहवालाचे सार्वजनिकीकरण आणि वाचन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड, अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. दिलीप चौधरी, गुण नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. हेडाव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळेचे सहायक संशोधन अधिकारी विनोद आपोतीकर आदींसह सर्वाजनिक बांधकाम विभाग, मनपाचे अभियंते व अधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते.

रस्त्यांच्या चाचणी अहवालाबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, रस्त्यांच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला चाचणी अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ कार्यालयाकडेही पाठविण्यात येईल.

नादुरुस्त झालेले अकोला शहरातील मुख्य रस्ते मुख्य डाकघर ते सिव्हील लाईन, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, माळीपुरा ते मोहता मिल रोड, अशोक वाटिका ते सरकारी बगीचा रोड आणि नेहरु पार्क ते एमईसीबी रोडचे एकूण 79 नमुने जुलै महिन्यात तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची पृथकरण चाचणी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय (34 नमुने ), अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या गुण नियंत्रण विभाग (27 नमुने), आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळेने 18 नमुन्यांची तपासणी केली.

नमुन्यांच्या तपासणीनंतर सदर विभागांकडून रस्त्यांच्या नमुन्यांचे करण्यात आलेल्या काँक्रीट कोअर चाचणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला बंद पाकिटातून प्राप्त झाला. या अहवालाचे आज उपस्थितांसमोर सार्वजनिकीकरण करुन वाचन करण्यात आले. चाचणी केलेल्या सर्व नमुन्यांचे निष्कर्ष भारतीय मानकांच्या अभिप्रेत निकषानुसार असमाधानकारक आढळून आले.