Akola News : राजकीय वारसा नसतानाही निवडणुकीच्या रिंगणात उतरले ‘बहिण-भाऊ’ ! 22 व्या वर्षीच ताब्यात घेतली ग्रामपंचायत

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं अनेकांचं वेगवेगळ्या स्वरूपात नुकसान झालं आहे. परंतु काहींनी मात्र याचा फायदाही करून घेतला आहे. अकोल्यातील आपोती येथील रहिवाशी असणाऱ्या इंजिनियर तरुणानं असंच काहीसं केलं आहे. लॉकडाऊनमुळं गावाकडे आलेल्या सदर 22 वर्षीय तरुणानं थेट ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. वैभव देविदास तराळे असं या तरुणाचं नाव आहे. खास बात अशी की, कोणताही राजकीय वारसा नसतानाही त्यानं स्वत:चं पॅनल तयार केलं.

लॉकडाऊनच्या काळात वैभव गावाकडे आला. या काळात त्याच्या ओळखी वाढल्या. वैभव सोबत इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण केलेली त्याची बहिण पूजा तराळे ही देखील या निवडणुकीत निवडून आली आहे. दोघंही बहिणभाऊ आता ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणार आहेत. महविद्यालीन शिक्षण घेत असतानाच वैभवला राजकारणाची आवड निर्माण झाली होती.

लॉकडाऊनमध्ये जेव्हा तो गावी आला तेव्हा त्यानं काही तरुणांना सोबत घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वत:चंच एक अपक्ष पॅनल तयार केलं. त्याला कोणताही राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यानं करून दाखवलं. त्याचे वडिल परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे.

निवडणुकीचा निकाल समोर आला तेव्हा वैभवसह सारेच अवाक् झाले होते. कारण मोठ्या आणि राजकीय आधार असलेल्या पक्षांना मागे टाकत त्यानं आपल्या पॅनलमधील 7 पैकी 5 जागा निवडून आणल्या होत्या. यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. वैभवनं याआधीही कॉलेज अध्यक्षाचं पद सांभाळलं आहे. तसंच विद्यापीठ प्रतिनिधी असलेला वैभव विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यापीठ चळवळीतही सहभागी होता.