अकोले : बिताक्याच्या बितनगडावर आढळली पुरातन तोफ !

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बिताका येथील बितनगडाच्या बुरुजावर एक जुनी तोफ आढळून आली आहे. दरम्यान ही तोफ शिवकालीन की पेशवेकालीन, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

अकोले तालुक्यातील बिताका येथील बितनगडाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच परिसरात पट्टाकिल्ला म्हणजेच विश्रामगड आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्याला एक ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. बिताका हे अकोले तालुक्याच्या हद्दीतील शेवटचे गाव आहे. या गावापासून नाशिक जिल्ह्याची हद्द सुरू होते. या गावातील बितनगडावर अनेक पांडवकालीन टाके असून या टाक्यांचा वापर गुराखी जनावराना पाणी पाजण्यासाठी करीत आहे.

या गडावर यापूर्वी गडवाट या सामाजिक संस्थेने अनेकदा जाऊन या गडावर स्वच्छता मोहीम राबवली आहे. मात्र या गडावर अजून ही काही गाळाने गाडून गेलेले टाके आहेत. आज गडावर असाच एका टाक्यातून गाळ काढण्याचे काम सुरू असताना गावातील विठ्ठल पेढेकर, लालू पेढेकर, संतोष भांगरे, दशरथ साबळे, प्रकाश पेढेकर, सचिन पेढेकर, विष्णु पेढेकर या तरूणांना गंजलेल्या अवस्थेतील एक लोखंडी तोफ आढळून आली. या तोफेचे वजन 50 किलो पेक्षा अधिक असल्याचे या तरुणांनी सांगितले. ही तोफ सापडून बराच कालावधी उलटून गेला तरी पुरातव विभाग व अन्य प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या नाही. त्यामुळे प्रशासनाला या ऐतिहासिक घटनेचे गांभीर्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Cannon
विश्रामगडामुळे ऐतिहासिक महत्व
अकोले तालुक्याची शेवटची हद्द असलेला बिताक्याचा हा बितनगड हा पूर्वी टेहाळणी बुरुज होता. या  बुरुजावरून आढळा विभागावर निगराणी ठेवली जात असावी. ही तोफ शिवकालीन आहे की पेशवेकालीन याची माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारीच देऊ शकतील. यापूर्वी रतनगडावर ही अशीच तोफ सापडली होती. ती तोफ सध्या नगर येथे आहे. विश्रामगडामुळे अकोले तालुक्यातील आढळा विभागाला ऐतिहासिक अनन्य साधारण महत्व आहे.
-शांताराम गजे सर, गडकिल्ले अभ्यासक

Visit : Policenama.com