अकोले : ‘त्या’ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत समजल्या जाणाऱ्या सुगाव खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच महेश संपत वैद्य व उपसरपंच सौ. रंजना दिलीप धराडे यांच्या विरुद्ध उर्वरित पाच सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव तहसीलदार मुकेश कांबळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सुगाव खुर्द येथे नवीन सरपंच-उपसरपंचाची प्रतीक्षा लागली आहे.

सुगाव खुर्द चे सरपंच-उपसरपंच यांच्या कार्यपद्धती विरुद्ध ग्रा.प.च्या अन्य पाच सदस्यांनी 6 डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता.यासंदर्भात तहसीलदार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी ग्रा. पं. कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. सुगाव खुर्द ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक सन 2015 मध्ये झाली होती. तेव्हापासून वैद्य सरपंच तर धराडे उपसरपंच म्हणून काम पाहत होते. 2017 ला सरपंच वैद्य यांचे विरुद्ध ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र त्यावेळी राजकीय समीकरणे बदलल्याने अविश्वास ठराव बारगळला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलली गेली.

त्यामुळे ग्रा. पं. च्या सात सदस्यांपैकी विलास वैद्य, अमोल वैद्य, सौ. प्रज्ञा प्रवीण वैद्य, सौ.कल्पना राजाराम पवार, सौ.रंजना अरुण वैद्य या पाच सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला. मागील चार वर्षात गावात कोणतीही विकास कामे झाली नाहीत, ग्रा. पं. चा कारभार करतांना सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही व पदाधिकारी मनमानी कारभार करत असल्याची कारणे अविश्वास दाखल करतांना सरपंच-उपसरपंच यांचे वर ठेवली होती.

या बैठकीत अविश्वास ठराव मंजूर होतो की मागील वेळेप्रमाणे बारगळतो याकडे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. मात्र अखेर एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी म्हणजेच पाच सदस्यांनी हात उंचावून मतदान केल्यानंतर सभेचे अध्यक्ष तहसीलदार कांबळे यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी तहसील कार्यालयाचे लिपिक एम. एस. सावळे, ग्रामसेवक सुनिल सोनार आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Visit : policenama.com