कुख्यात गुंडाचा पोलिसांच्या पथकावर हल्ला, API जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – गस्त घालत असताना एका कुख्यात गुंडाने पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी कुख्यात गुंड अक्षय राठोड याच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख हे जखमी झाले आहेत. हा प्रकार शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बसस्थानक परिसरात घडला.

अपर पोलीस अधीक्षक नरूल हसन यांनी रात्री ऑल आऊट मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील तपासी पथक बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कुख्यात गुंड अक्षय राठोड हा जाताना पथकाला दिसला. त्यावेळी त्यांनी त्याला थांबवून कुठे फिरत आहे अशी विचारणा केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या साथीदारांची अंगझडती घते होते.

पोलीस कर्मचारी अक्षय राठोड याच्या साथीदारांची झडती घेत असताना अक्षय राठोड याने पोलिसांसोबत हुज्जत घातली. मै यवतमाल का भाऊ हूँ, अक्षय राठोड हूँ अशा शब्दात पोलिसांना धमकावत त्याने वाद घातले. तर त्याच्या सहकाऱ्यांनी तपास पथकावर दगडफेक केली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या उजव्या पायाला आणि छातीवर दगड लागल्याने ते जखमी झाले.

पोलिसांवर दगडफेक करून आरोपी पळून जात असताना तपास पथकातील पोलिसांनी अक्षय राठोड याच्यासह शुभम वघेल, आशीष दांडेकर, सचिन वाढवे यांना ताब्यात घतले. अक्षय राठोड याची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.