पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले तालुके असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत. स्वराज्याची पहिली राजधानी राजगडपासून अनेक गडकोट असलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करून सुळे यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रहाणे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. याबरोबरच वेल्हे तालुक्यास राजगड हे नाव देणे आणि राजगडावरील महाराणी सईबाई यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याबाबत त्यांनी पुनरुच्चार केला.

जो गड जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले तो तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड हे वेल्हे तालुक्यातील दोन किल्ले, महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली, तो भोर तालुक्यातील रोहिडा, हवेली तालुक्यातील सिंहगड, पुरंदर तालुक्यातील पुरंदर, मुळशी तालुक्यातील घनगड, कोरीगड, तैलबैला, कैलास गड, आंबवणे येथील कोऱ्हाईगड, याशिवाय मुळशी आणि मावळ तालुक्यांच्या हद्दीलगत असलेले तुंग आणि तिकोणा हे किल्ले आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत पुरंदर तालुक्यातील खंडोबा देवस्थान अर्थात जेजुरी गड आणि पुणे जिल्ह्यातील इतर सर्वच किल्यांना जोडणारा रस्ता तयार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

वरील किल्ल्यांपैकी अनेक ठिकाणी पोहोचण्यासाठी सोपा मार्ग नसल्याने गडप्रेमी आणि पर्यटकांची दमछाक होते. त्यांना उपयुक्त आणि गडापर्यंत सहज पोहोचता येईल, असा रस्ता झाल्यास गडप्रेमींची संख्या वाढेल, पर्यटन वाढेल. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल. त्यामुळे असा रस्ता तयार करण्यात यावा, असे सुळे यांनी सुचविले आहे.