Jammu and Kashmir : नायब राज्यपालांचे आदेश, म्हणाले – ‘सरकारी कार्यालयांवर 15 दिवसांत तिरंगा फडकवा’

जम्मू : पोलीसनामा ऑनलाईन – दोन वर्षांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविल्यांनतर आता एक देश, एक ध्वज अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नायब राज्यपाल सिन्हा यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 असताना येथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज होता. मात्र 2 वर्षांपूर्वी येथून अनुच्छेद 370 हटवून त्याचे विभाजन केले आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश झाला आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांनी काही सूचना केल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली. नायब राज्यपाल सिन्हा यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासोबत एक बैठक घेतली. बैठकीनंतर जम्मू काश्मीरमधील सर्व सरकारी कार्यालयावर आगामी 15 दिवसांत तिरंगा ध्वज फडकावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्याचा तपशील सादर करण्याच्या सूचना नायब राज्यपालानी दिल्या आहेत. या सर्वांना अमृत महोत्सवाच्या विशेष सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे.