राष्ट्रवादीत ‘ऑल इज वेल’ ? अजित पवारांच्या बैठकीनंतर शरद पवार म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी आमदारीकीचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईच्या निवासस्थानी भेट घेतली. पवार कुटूंबातील जवळपास सर्वजण या कौटूंबिक बैठकीला हजर होते. अजित पवार यांच्या राजीनामा आणि इतर गोष्टींबाबत चर्चा झाली असून सर्वकाही अलबेल असल्याचं शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितलं. दरम्यान, अजित पवार हे त्यांच्या राजीनाम्याबाबत स्वतः प्रसारमाध्यमांशी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बोलतील असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार हे त्यांच्या एक-दोन सहकार्‍यांशी चर्चा करून त्यांची राजीनाम्याबाबतची आणि आगामी काळातील भूमिका प्रसारमाध्यमांसमोर ठेवणार असल्याची माहिती शरद पवार यांनी सांगितली. दरम्यान, कुटूंब प्रमुख म्हणून आपण कोणता सल्‍ला अजित पवारांना दिला असा प्रश्‍न शरद पवारांना विचारल्यावर त्यांनी माझा चेहरा काय चिंताग्रस्त दिसतोय काय असं सांगितलं. सर्व काय ऑल इज क्लिअर समजायचं काय असे विचारल्यानंतर देखील शरद पवारांनी माझा चेहरा काय चिंताग्रस्त दिसतोय काय असं सांगितलं. दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तूळात प्रचंड खळबळ उडाली होती. अजित पवार हे त्यांच्या जवळच्या सहकार्‍यांशी बोलून त्यांची भूमिका मांडणार आहेत.

Visit : Policenama.com