‘सबंध शेतकऱ्यांच्या जातीलाच ‘मोदीआळी’ लागली आहे’

मुंबई : वृत्तसंस्था – कापसावर बोंडआळी नाही तर सबंध शेतकऱ्यांच्या जातीलाच ‘मोदीआळी’ लागल्याचा उल्लेख एका शेतकऱ्याने जिंतूरच्या सभेत केला असे भाष्य विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदींवर हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाविरोधात निर्धार परिवर्तन यात्रा सुरु केली. परिवर्तन यात्रेचे आगमन परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे झाले.

धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदींवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “बोंडआळींना अनुदान घोषित करून दीडकी न दिलेल्या सरकारवरील शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. कापसावर बोंडआळी नाही तर सबंध शेतकऱ्यांच्या जातीलाच ‘मोदीआळी’ लागल्याचा उल्लेख एका शेतकऱ्याने जिंतूरच्या सभेत केला. सरकार शेतकऱ्यांच्या मनातून उतरलं आहे, सत्तेतून पण उतरणारच. “धनंजय मुंडे यांनी जिंतूर येथील परिवर्तन यात्रेच्या सभेतील एक फोटो पोस्ट करत शेतकऱ्यांना घोषित केलेल्या बोंडआळी अनुदानाच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान  जिंतूर येथील परिवर्तन यात्रेच्या सभेला लोकांचा भरघोस प्रतिसाद होता हेही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. शिवाय सभेला असणारा हा प्रतिसाद म्हणजे आगामी  निवडणुकांसाठी हा विजयाचा मजबूत पाया असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, “परिवर्तन यात्रेचे आगमन परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे झाले. जिंतूरच्या सभेत लोकांच्या अभूतपूर्व सहभागाने आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे विक्रम मोडले. येणाऱ्या निवडणुकांसाठी हा विजयाचा मजबूत पाया आहे.”