IAS आणि IPS यांच्या बदल्यांसह राज्यपाल करणार ‘या’ शासकीय कामांचे वाटप

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – भारतीय राज्यघटनेच्या कलम १६६ नुसार प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून तसेच भारताचे राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल शासकीय कामकाजाचे वाटप करणार असून राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत शासकीय कामकाज राज्यपालांमार्फत निकाली लागणार आहेत.

शासन कार्य नियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या ज्या बाबींसाठी मंत्रिपरिषदेची मान्यता आवश्यक होती, तसेच ज्या प्रकरणी मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आदेश प्राप्त करणे आवश्यक होते अशी सर्व प्रकरणे आता मुख्य सचिव यांचेकडून राज्यपालांना सादर करण्यात येतील. तसेच सहसचिव व त्यावरील दर्जाचे अधिकारी तसेच भारतीय प्रशासन सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय वनसेवेतील अधिकारी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व त्यावरील दर्जाचे अधिकारी यांच्या बदली आणि पदस्थापनेची प्रकरणे मुख्य सचिवांच्या द्वारे राज्यपालांना सादर करण्यात येतील. ज्या बदल्या याआधी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने होत होत्या त्या आता राज्यपालांच्या मान्यतेने होणार आहेत.

कायदा व सुव्यवस्थे संबंधित बाबी मुख्य सचिवांमार्फत राज्यपालांकडे सादर करण्यात येतील. तसेच सर्वसाधारण प्रकारची कामे जी मंत्र्यांच्या स्तरावर निकाली काढण्यात येत होती ती कामे मुख्य सचिव आता राज्यपाल यांच्या मार्फत निकाली काढतील. याव्यतिरिक्त ज्या प्रकारात एकापेक्षा जास्त विभागांचा संबंध येत असतो अशी प्रकरणे राज्यपाल मुख्य सचिवांशी विचारविनिमय करून निकाली लावतील.

याव्यतिरिक्त विधानमंडळाशी संबंधित बाबींची वस्तुनिष्ठ माहिती आणि सध्याची स्थिती त्या-त्या विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने विधानमंडळ सचिवालयास कळविण्यात येतील. तसेच मुख्य सचिवांच्या आवाक्याबाहेरील तातडीच्या आणि कालमर्यादा असलेल्या सर्व प्रशासकीय आणि वित्तीय बाबी मुख्य सचिवांकडून राज्यपालांना सादर करण्यात येतील. त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठ माहिती आणि सध्यस्थितीची माहिती देणारी शपथपत्रे विभागातील सचिवांच्या मान्यतेने दाखल करण्यात यावी आणि धोरणात्मक बाबी संबंधित शपथपत्र मुख्य सचिवांमार्फत राज्यपालांना सादर करण्यात यावे असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like