Amazon चे सीईओ Jeff Bezos यांचा राजीनामा, त्यांच्या जागी येणार ‘ही’ व्यक्ती

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वर्षा अखेरपर्यंत ते पद सोडणार आहेत. जेफ बेझोस यांनी मंगळवारी (दि. 2) राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. एडब्ल्यूएसचे सीईओ अँडी जेसी (Andy Jassy) या वर्षातील तिसऱ्या तिमाहित बेझेस यांची जागा घेणार आहेत. आपण राजीनामा देत असल्याची माहिती बेझोस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या सीईओ पदाची भूमिका सोडत आहे. जेसी सध्या ॲमेझॉनच्या वेब सर्व्हिसचे प्रमुख आहेत.

ॲमेझॉन कंपनीची स्थापना
बेझोस यांनी स्टार्टअपच्या स्वरुपात ॲमेझॉन कंपनीची 1994 मध्ये स्थापना केली. सध्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये ॲमेझॉनचे नाव घेतले जाते. ॲमेझॉनमधील भागीदारीमुळे जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या या कंपनीने 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यात तब्बल 100 बिलियन डॉलरची विक्री केली होती. त्यामुळे ॲमेझॉलनला होणारा नफा रेकॉर्ड स्तराने वाढला होता.

राजीनाम्यानंतर यावर लक्ष केंद्रीत करणार
बोझेस यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते ॲमेझॉनच्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असतील मात्र, फेलन्थ्रॉपिक इनीशिएटिव्ह्स अर्थात कल्याणकारी योजना डे वन फंड आणि बेझोस अर्थ फंड यावर ते लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्यांनी अँडी जेसी यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. बेझोस ॲमेझॉन व्यतिरिक्त वॉशिंग्टन पोस्ट हे वृत्तपत्र आणि खासगी स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचे मालक आहेत.