नगरसेवक हत्या प्रकरण : भावाचे अनैतिक संबंध जीवावर बेतले

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय जोगदंड यांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. १८ ) रात्री सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन याने दिलेल्या फिर्याद दिली आहे.  नितीन जोगदंड या भावाचे भावकीतील महिले सोबत असणारे अनैतिक संबंध विजय जोगदंड यांच्या जीवावर बेतले आहेत. भावावर होत असलेल्या खूनी हल्ल्यातून भावाची सुटका करण्यासाठी ते सरसावले होते. या खूनप्रकरणी त्यांच्याच भावकीतील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन जोगदंड फिर्यादीत नमूद केले आहे की, दोन वर्षापूर्वी त्याचे आणि भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध होते. या कारणामुळे भगवान दत्तू जोगदंड आणि त्याची मुले नितीनवर चिडून होते.
मिळलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विजय जोगदंड यांचे लहान बंधू नितीन जोगदंड यांचे भावकीतीलच भगवान जोगदंड यांच्या मुलांसोबत भांडण सुरू होते. ही माहिती कळाल्यानंतर विजय जोगदंड तेथे पोहोचले. नितीन यांना मारहाण होत असताना विजय यांनी त्यास बाजूला काढले असता दोघांनी तलवार आणि कोयत्याने केलेले वार विजय जोगदंड यांच्यावरच पडले. यात छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
या प्रकरणी राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मन्या भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड यांच्यावर आंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलीसांनी अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत.