अमिषा पटेलवर अडीच कोटींच्या फसवणुकीचा आरोप; न्यायालयाने मागितले उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदी चित्रपट ‘कहो ना प्यार है’तून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री अमिषा पटेल आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण एका व्यापाऱ्याने अमिषा पटेलला अडीच कोटींच्या फसवणूक प्रकरणी कोर्टात खेचले आहे. अजय कुमार सिंह असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

अजय कुमार सिंह हे ‘लव्हली वर्ल्ड एन्टरटेन्मेंट’चे प्रोपरायटर आहेत. त्यांनी अमिषा पटेल विरोधात तक्रार दिली आहे. यामध्ये म्हटले आहे, की अमिषा पटेलने त्यांची अडीच कोटींची फसवणूक केली आहे. 2017 मध्ये एका कार्यक्रमात अमिषा पटेल आणि अजय कुमार सिंह हे भेटले होते. त्यानंतर देसी मॅजिक कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास अमिषाने सांगितले. त्यानंतर त्यांनी फिल्मसाठी अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. पण अमिषाने त्या फिल्ममध्ये काम करण्यास नकार दिला होता. जेव्हा अजय कुमार सिंह यांना समजले, की ही फिल्म तयारच झाली नाही. तेव्हा त्यांनी अमिषा पटेलकडे पैशांची मागणी सुरु केली.

दरम्यान, सातत्याने पैसे मागूनही अमिषा पटेलने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे अजय कुमार सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आनंद सेन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटल्यावर सुनावणी केली. त्यामध्ये अमिषा पटेलला तिची बाजू मांडण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली आहे.