…तर शिवसेनाच उरली नसती, गृहमंत्री अमित शहांचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेबांच्या सर्व वचनांना काशीत बुडवून शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्गात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर आणि खासकरून शिवसेनेवर हल्लाबोल केला.

शिवसेनेनं सत्तेच्या लालसेपोटी जनमताचा अनादर करुन साथ सोडली. राज्यातील सध्याचं सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असून याची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात आहेत, असा खोचक टोला अमित शहा यांनी महाविकास आघाडीला लगावला.

मी खुलेआम वचन देतो, बंद खोलीत नाही

महाराष्ट्राच्या विधानसभा निडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतही वचन दिले नसल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करताना शहा म्हणाले, शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचे म्हटले. पण मी अस कोणतंच वचन दिलं नाही. मी बंद खोलीत नाही, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे.

बिहारमध्ये शब्द पाळला

बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करु असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या. पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. आम्ही एकदा वचन दिलं की पाळतो, असे अमित शहा यांनी सांगितले.

मोदींच्या नावनं मतं का मागितली ? शिवसेनेला प्रश्न

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाच आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला ? मोदींच्या नावानं मतं का मागितली ? प्रचार सभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्ही का नाही बोललात ? असे प्रश्न उपस्थित करुन शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

राणेंवर अन्याय होणार नाही

नारायण राणे यांच्याविषयी बोलताना शहा म्हणाले, नारायण राणे हे अन्याय विरोधात पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. ते अन्याय होत असेल तर भविष्याचा कोणताही विचार न करता अन्यायाचा प्रतिकार करतात. म्हणूनच त्यांची वाटचाल ही वळणावळणाची राहीली आहे. त्यांचा सन्मान आणि आदर कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो, असे शहा म्हणाले.