अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यू नाहीच, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाल्याने एम्स मध्ये भरती करण्यात आले होते. त्याबाबतचे ट्विट त्यांनी स्वतः केले होते. मात्र एका काँग्रेस नेत्याने ही बाब खोटी असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ‘अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे ‘असा दावा काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे. यापूर्वी  हरिप्रसाद यांनी शाह यांच्या आजारपणावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.
याबाबत बोलताना हरिप्रसाद म्हणाले, ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मधील (एम्स) लोकांना आम्ही ओळखतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, स्वाईन फ्ल्यूमुळे शाह रुग्णालयात दाखल झालेले नाहीत. मला आणखी तथ्य गोळा करू द्या. त्यानंतर मी पुन्हा माध्यमांशी संपर्क साधेल, असे बी. के. हरिप्रसाद यांनी म्हटले आहे.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाल्यामुळे ते बुधवारी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल झाले होते. याची माहिती स्वत: अमित शाह यांनीच टि्वट करत दिली होती. यानंतर बी. के. हरिप्रसाद यांनीच शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केली होती.

‘…चाणक्यने ३ वेळा प्रयत्न करूनही ते यशस्वी झाले नाहीत. ते दिवसाढवळ्या स्वप्न पाहत आहेत. शाह यांनी काँग्रेसच्या ४ आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना किडनॅप केले आहे. त्यामुळेच शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाला आहे’, असे वक्तव्य हरिप्रसाद यांनी यापूर्वी केले होते.