अमित शाह यांच्या हस्ते ‘आयुष्मान सीएपीएफ’ चे उद्घाटन, 28 लाख जवानांना मिळणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी ‘आयुष्मान सीएपीएफ’ आरोग्य सेवा योजना सुरू केली. त्याअंतर्गत देशातील सर्व सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना (CAPF) केंद्रीय आरोग्य विमा कार्यक्रमाचा लाभ मिळणार आहे. शाह यांनी येथील सात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील (सीएपीएफ) काही कर्मचार्‍यांमध्ये ‘आयुष्मान सीएपीएफ’ हेल्थ कार्डचे औपचारिक वितरण केले. या योजनेंतर्गत सीएपीएफ, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) चे सुमारे 28 लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश ‘आयुष्मान भारतः प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ मध्ये केला जाईल. गुवाहाटी येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाला.

यावेळी गृहमंत्री शहा, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आसामचे आरोग्यमंत्री हिमंता विश्व सरमा उपस्थित होते. अमित शहा शिलॉंग येथे शनिवारी उत्तर-पूर्व परिषद (एनईसी) च्या 69 व्या पूर्ण बैठकीचे अध्यक्ष होते. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के. संगमा आणि उत्तर पूर्व प्रांताचे केंद्रीय मंत्री आणि परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र सिंह यांनी अप्पर शिलॉंगमध्ये हेलिपॅड येथे गृहमंत्र्यांचे स्वागत केले.

एनईसी अधिकाऱ्यांनी सांगितले कि, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्यपाल जगदीश मुखी आणि मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा पूर्ण बैठकात उपस्थित नव्हते व यात त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवसीय बैठकीत राज्य व केंद्रातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्ण बैठकीत विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात येत असून ईशान्येकडील भविष्यातील योजनांवर चर्चा केली जात आहे.