गृहमंत्री अमित शहांनी सिंधूदुर्गात केलेल्या त्या वक्व्यावरून शिवसेनेनं दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात शिवसेनेला दगाबाज असे संबोधत जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिवसेनेला आपण कोणतेही मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नसल्याचे सांगत शिवसेना खोटे बोलत असल्याचे शहा यांनी म्हटले. शहा यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, शिवसेनेला कोणतेही वचन दिले नव्हते ते सांगायला अमित शहा यांना सव्वा वर्षे लागली. याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे हे स्पष्ट होत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.

अरविंद सावंत म्हणाले, ठाकरे कुटुंब नेहमीच खरे बोलते. शिवसेना-भाजप यांच्यामध्ये 50-50 चे सूत्र ठरले होते. अमित शहा यांनी हे सूत्र घोषित केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच ही फसवणूक झाली. ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन सहन झाली नाही, म्हणूनच त्यांना पुढील पावलं उचलावी लागली. जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणात गेले. अशा वेळी त्यांनी मुंबईत यायला हवे होते. असे असताना मग ते मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत ? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

त्यामुळे भाजपचा नितीश कुमारांना पाठिंबा

भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी सर्व राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत आला आहे. सत्तेसाठी हा पक्ष काहीही करतो. बिहारमध्ये आपल्या हातून सत्ता जाईल ही भीती होती. त्यांना पाठिंबा देण्यास कोणीही तयार नव्हते. अखेर नितीश कुमार यांना पाठिंबा द्यावा लागला, असा टोला सावंत यांनी लगावला.

काय म्हणाले अमित शहा ?

महाराष्ट्राच्या विधानसभा निडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतही वचन दिले नसल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करताना शहा म्हणाले, शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचे म्हटले, पण मी अस कोणतंच वचन दिलं नाही. मी बंद खोलीत नाही, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे.