‘बिग बी’ अमिताभची तेलुगू सिनेकर्मचार्‍यांना 1 कोटी 80 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कलाविश्वातील कामकाजही ठप्प झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणार्‍यांना अनेकांना कोरोनाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी अशा गरजूंना मदत केली आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी काम करणार्‍या कामगारांना मदत केल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गरजू कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी तेलुगू सिनेकर्मचार्‍यासाठी 1.8 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

लॉकडाउनमुळे सिनेक्षेत्रात काम करणार्‍या बॅकस्टेज कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांचे चित्रीकरण रखडले असल्यामुळे सेटवर रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. या काळात अनेक सेलिब्रिटींनी अशा कामगारांना मदतही केली आहे. मात्र बिग बींनी आता त्यांच्या मदतीचा मोर्चा दाक्षिणात्य कलाविश्वाकडे वळविला आहे.

अमिताभ बच्चन यांनी तेलुगू सिनेकर्मचार्‍यांना केलेल्या मदतीनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. ‘ अमिताभ जी यांनी तेलुगू कलाविश्वातील रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी 1 हजार 500 रुपयांचे 12 हजार रिलीफ कुपन दिले आहेत. कर्मचार्‍यांसाठी केलेल्या या मदतीसाठी बिग बी तुमचे मनापासून आभार. या कुपनचा वापर बिग बाजारमध्ये करता येऊ शकतो, असे ट्विट चिरंजीवने केले आहे.

आतापर्यंत मराठी कलाविश्वापासून ते दाक्षिणात्य कलाविश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान,आमिर खान, महेश बाबू,सोनू सुद,चिरंजीवी या सारख्या कलाकारांचा समावेश आहे.