कॉ. पानसरे हत्या प्रकरणी अमोल काळेला एसआयटी घेणार लवकरच ताब्यात

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाईन  – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून त्याचा एसआयटी लवकरच ताबा घेणार आहे. बंगळुरू सीबीआय न्यायालयाने एसआयटीला त्याबाबतची मंजुरी दिल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

संशयित काळे हा सध्या सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा ताबा मिळावा, यासाठी एसआयटीने बंगळुरूच्या सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे; त्यामुळे लवकरच एसआयटीचे पथक काळेचा ताबा घेणार आहे. चौकशीत अनेक धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती येतील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने अमोल काळे सह शरद कळसकर व त्याच्या इतर साथीदारांना यापूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. सीबीआयच्या कस्टडीत असताना कॉ. पानसरे यांच्या हत्येविषयी एसआयटीच्या अधिकाऱ्यानी त्याची चौकशी केली होती. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रारही त्याने न्यायालयात केली होती. सध्या त्यांना पुन्हा कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नालासोपारा परिसरात शरद कळसकर याच्या घरातून पोलिसांनी गावठी बॉम्ब, पिस्तुले, स्फोटके जप्त केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्यांसंबंधी महत्त्वाची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली. पानसरे, दाभोलकर हत्येचा मास्टर मार्इंड संशयित डॉ. विरेंद्रसिंह तावडे असला, तरी अमोल काळे हा कोल्हापुरात वास्तव्याला असताना त्याने पानसरे यांच्या हत्येची रेकी केल्याचा संशय आहे; त्यासाठी त्याने मित्राकडून मागून आणलेल्या दोन काळ्या रंगाच्या दुचाकींचा वापर केला होता. त्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत; परंतु, त्यांचे मालक अद्याप मिळून आलेले नाहीत. या चारही हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर केला आहे. पानसरे हत्येच्या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केलेल्या चार पुंगळ्या व एक जिवंत काडतूस तसेच लंकेश हत्येतील पुंगळ्या यांच्यातील साधर्म्य तपासण्यास त्या गुजरातमधील गांधीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या आहेत.