‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्या तन्मय फडणवीस यांने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्यावरून कॉंग्रेसने फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. तन्मय फडणवीस याचे वय 45 च्या वर नसताना देखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला होता. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून, आता अमृता फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही सेवेची प्राथमिकता शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चतुर्वेदी यांनी याला म्हणतात विशेषाधिकार असे म्हणत निशाणा साधला होता. दरम्यान तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांप्रमाणे लसीचा डोस दिला याची मला कल्पना नाही. हे नियांमांनुसार झाले असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु नियमांचे उल्लंघन करून जर झाले तर ते अयोग्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.