आणि भाजप इच्छुक अन् पोलिसांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेणार या ‘चर्चे’ने पक्षातील इच्छुकांची ‘धाकधूक’ रविवारी भलतीच वाढवली. मात्र ऐनवेळी ठरलेली भेट होऊ न शकल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, पण अमित शहा नक्की शिरोळे यांच्या पक्ष कार्यालयाला भेट देणार होते की, या परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांशी संवाद साधणार होते, याबाबत पक्ष वतुर्ळात जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अमित शहा यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची रविवारी रात्री सदिच्छा भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांचा शहरात भेटी गाठीचा सिलसिला सुरु होता. रात्री दहा च्या सुमारास त्यांच्या या भेटी संपल्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

अमित शहा यांचे पुणे दौऱ्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे समाजमाध्यमे हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि गणेश कला क्रीडा रंगमंच येथे चाणक्य नीती या विषयावरील व्याख्यान असे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. या अधिकृत कार्यक्रमांसाठी शहा यांचे रविवारी सकाळी पुण्यात आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

[amazon_link asins=’B076Y4P7NQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’777e2c0f-832b-11e8-b361-59075fcc951e’]

बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमापूर्वी खासदार शिरोळे यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये अमित शहा काही मोजक्या निमंत्रितांशी संवाद साधणार होते. या हॉटेल शेजारीच शिरोळे यांचे संपर्क कार्यालय असल्यामुळे शहा यांनी कार्यालयाला भेट द्यावी, अशी विनंती शिरोळे यांनी केली आणि शहा यांनी ती मान्य केल्याची चर्चा शहर भाजपच्या वतुर्ळात सुरू झाली. या परिसरात शहा येणार म्हणून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे शहा-शिरोळे भेटीच्या चर्चेला आणखी जोर मिळाला. मात्र, काहीतरी चक्रे फिरली आणि शहा या भागात फिरकलेच नाहीत.

अमित शहा यांनी सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे दर्शन घेतले. पालख्या दर्शनासाठी त्यावेळी मोठी रांग लागली होती. त्यातच त्यांच्या आजू बाजूला प्रचंड गर्दी असताना त्यांनी पालख्यांचे दर्शन घेतले.

त्यांच्या कार्यक्रमात ऐनवेळी अनेक बदल केले गेले. मुळ कार्यक्रमात पालखी दर्शन, बालगंधर्व रंगमंदिरात मार्गदर्शन आणि सायंकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे व्याख्यान असाच दौरा ठरविण्यात आला होता. त्यानंतर श्रीमंत दगडुशेट हलवाई गणपती मंदिराला भेट, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट, याशिवाय रात्री उशिरा अचानक मार्केटयार्ड येथे एका ठिकाणी त्यांनी भेट घेतली. या संपूर्ण दौऱ्यात ऐनवेळी कार्यक्रम ठरविणे, जाण्यायेण्याचा मार्ग बदलणे यामुळे शहर पोलीस दलावर मोठा ताण पडला होता. पालख्याबरोबर शहरात आधीच ४ ते ५ लाख लोक आले असताना अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या दौऱ्याचा रस्त्यावरील बंदोबस्त करण्याचे जिकीरीचे काम पोलिसांना करावे लागले. ऐनवेळी प्रचंड धावपळ करावी लागली. रात्री उशिरा त्यांचा दौरा संपल्यानंतर पोलिसांचीही सुटकेचा नि:श्वास टाकला.