‘पॅनकार्ड’ च्या संतप्त गुंतवणूकदारांनी पुण्यात निर्मला सीतारामन यांचा पुतळा जाळला, अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची ‘राष्ट्रशक्ती’ची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लबच्या सर्वात महागड्या हॉटेल ला 6 जानेवारीला आग लागली व करोडो रूपयांची मालमत्ता नष्ट झाली. त्या घटनेला आज चार दिवस उलटूनही या ठिकाणी कोणतीही सरकारी यंत्रणा पोहोचलेलीच नाही ही धक्कादायक बाब आज उघडकीस आली आहे. या बाबत राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को ऑर्डीनेशन कमिटी ने ही आग लागली नसून लावली गेली असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

त्यांनी या घटनेच्या CBI चौकशीची मागणीही केली होती. मात्र ईतकी मोठी घटना घडूनही सेबीचा कोणीही अधिकारी घटना स्थळी येऊ नये? हे संतापजनक आहे. गुंतवणुकदारांच्या भवितव्याबाबत केंद्र सरकारला घेणे देणे दिसत नाही. आजही या पंचतारांकित हॉटेलची अवस्था तीच असून गुंतवणुकदारांचे महत्वाचे कागदपत्रे ईतस्तः विखुरलेल्या अवस्थेत आहेत. या सर्व प्रकारानंतर राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को ऑर्डीनेशन कमिटी ने संतप्त गुंतवणूकदारांसहित जळालेल्या हॉटेलच्या बाहेर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पुतळा जाळला व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनामधे महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांचे गुंतवणूकदार प्रतिनिधी उपस्थित राहिले होते.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को ऑर्डीनेशन कमिटी चे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले “केंद्र सरकारच्या सेबीला आगीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्यायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज या ठिकाणी अर्थमंत्र्यांच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केले असून सरकारला यानंतरही जाग आली नाही तर मुंबईत सेबीच्या कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात येतील.”

यावेळी संघटनेचे सचिव शहाजी आरसुळ, इन्वेस्टर वेलफेअर फोरमचे सचिव मुकुटराव मोरे, सुहास जितकर, पद्माकर कांबळे, यु. के. काजुळकर, अरुण खोत, सहदेव गायकवाड, रूपाली मोहोळकर, विजय पवार, सुनील साळवी आदी उपस्थित होते.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/