शुटिंग, राजकीय सभा होतात पण उद्योगांना बंदी; लॉकडाऊनवर अनिल अंबानी यांच्या मुलाचे ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यामध्ये अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनवर घणाघाती टीका केली आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून अनमोल अंबानी यांनी ट्विट करत भाष्य केले. ते म्हणाले, ‘राजकीय नेते रॅलीचे आयोजन करत आहेत आणि चित्रपटांचे शुटिंगही सुरू आहे. पण उद्योगांवर कठोर निर्बंध लादले आहेत’. तसेच अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमकं काय? कलाकार शुटिंग करत आहेत. राजकीय नेते मोठ्या संख्येने रॅली करत आहेत. पण तुमचा उद्योग आणि काम हे अत्यावश्यक नाही ! प्रत्येक व्यक्तीला त्याचं काम अत्यावश्यक असतं’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर विरोधकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. तसेच काही नेतेमंडळींकडून टीकाही केली जात आहे. त्यानंतर आता थेट अंबानी कुटुंबातून लॉकडाऊनवर प्रतिक्रिया देण्यात आल्याने यावर आता जोरदार चर्चा सुरु आहेत.

महाराष्ट्रात कडक निर्बंध

राज्यात सोमवारपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. खासगी कार्यालयांना पूर्णपणे वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. तर हॉटेल्स, रेस्टॉरंट, मनोरंजनाची ठिकाणं पूर्णपणे बंद राहणार आहेत. मात्र, किराणा माल, मेडिकल, दवाखाने हे सुरु राहतील. हे नवे नियम 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.