ED चा राजकारणासाठी वापर हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिलं नाही, गृहमंत्री देशमुख संतापले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची चौकशी लावायची. सीबीआयच्या बाबतीत तर आम्ही आता निर्णय घेतला आहे, की आमच्या परवानगीशिवाय सीबीआयला कोणत्याही व्यक्तीची चौकशी करता येणार नाही. मात्र, ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे. त्याचा असा राजकारणासाठी वापर करण हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही पाहिलं नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन देशमुख यांनी भाजपवर हे आरोप केले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस धाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. खुद्द खडसेंनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केले असून बुधवारी ते चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आल्याने राजकारण चांगलंच तापल आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर थेट आरोप करत असून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका केली आहे.