अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये म्हणून मोदी सरकारकडून आर्थिक सवलतींच्या घोषणेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे. परिणामी, ‘स्पुटनिक व्ही’ या रशियन बनावटीच्या लसीला अलीकडेच मान्यता देण्यात आली.

दरम्यान, टाळेबंदीच्या भीतीने अनेक मजूर आपापल्या गावी निघाले आहेत. अशा परिस्थितीत रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये, यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

संभाव्य मदत

– सर्व वयोगटांतील कामगारांचे तातडीने लसीकरण केले जाईल
– गरीब तसेच मजुरांसाठी अर्थसाह्य पुरवले जाईल
– सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या कोणत्याही अडचणींना तत्पर साहाय्य करण्यात येईल
– उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याला प्राधान्य
दिले जाईल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीवर नक्की परिणाम होईल; परंतु लसीकरण मोहिमेचा वेग किती राहतो यावरही त्याचे यशापयश अवलंबून राहील.
– डी. के. श्रीवास्तव, मुख्य धोरण सल्लागार, अर्न्स्ट अँड यंग, इंडिया