पाकिस्तानला मोठा झटका, अमेरिका आणि पॅरिसमधील हॉटेल्स ‘अ‍ॅटॅच’, मोठा अपमान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काही दिवसांपूर्वी पैसे न चुकवल्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान मलेशियानं जप्त केलं होतं. तसंच त्यातील प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या अमेरिका आणि पॅरिसमधील हॉटेल्सनादेखील अ‍ॅटॅच करण्यात आलं आहे. पाकिस्तानला सध्या एकामागून एक झटके लागण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट हॉटेल आणि पॅरिसमधील स्क्राईब हॉटेल अ‍ॅटॅच करण्यात आले आहेत. प्रलंबित असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आता या हॉटेल्सची विक्री करता येणार नाही. ब्रिटनच्या उच्च न्यायालयानं पाकिस्तानच्या उच्चायोगाच्या खात्यातून २८.७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचे आदेशही दिले आहेत.

या करवाईननंतर पाकिस्ताननंही सरकारच्या दुतावासांच्या खात्यात किमान रक्कम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मलेशियात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग-७७७ हे विमान जप्त केलं होतं. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच ही कारवाई करण्यात आली होती. या विमानात तब्बल १७२ प्रवासी होते. यानंतर पाकिस्ताननं भाडेतत्त्वावर घेतलेलं अन्य विमानही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान विमान जप्तीची कारवाई झाल्यानंतर पाकिस्तान परदेशातील आपली संपत्ती विकण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे पैसे थकले

पाकिस्तान मलेशियातील न्यायालयात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान तात्काळ सोडवण्यासाठी सुनावणी घेण्यास योग्य ती पावलं उचलत असल्याचं पीआयएकडून सांगण्यात आलं. तर दुसरीक़डे पाकिस्ताच्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून पीआयएनं २०१५ मध्ये दोन विमानं भाडेतत्त्वार घेतली असून कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर पैसे चुकवता आले नसल्याचं सांगितलं आहे.