पुरंदच्या विमानतळाच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमण्याचा मार्ग झाला मोकळा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यात होणार आहे. त्या विमानतळाचा आराखडा तयार करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार असून विमानतळाच्या या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी  प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. गुरुवारी झालेल्या  (दि.६ रोजी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सह्याद्री अथितीगृहात  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली ६५ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत  नागरी हवाई वाहतूक विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक कविता गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वतीने छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम केले जाणार असून येत्या काही वर्षात पुरंदर या ठिकाणी पुण्याचा सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेले विमानतळ आपणाला पाहायला मिळणार आहे. आज पार पडलेल्या बैठकीला विमानतळाचा आराखडा बनवण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून येत्या काही काळात विमानतळ आराखड्याच्या अनुशंगाने वेगवान हालचाली घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे आहे विमान तळासाठीचे भूसंपादन 
पुरंदर येथे होऊ घातलेल्या नवीन विमानतळासाठी  २८३२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून यावर भव्य आंतराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती संभाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मभूमीत हे विमानतळ उभारले जात असल्याने त्यांच्या नावाने या विमानतळाला ओळखले जावे म्हणून त्यांचे नाव या विमानतळाला देण्यात आले आहे. या विमानतळाला पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी  या सात गावातील २८३२ हेक्टर  जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.  वनपुरी  ३३९ हेक्‍टर, उदाचीवाडी २६१ हेक्‍टर, कुंभारवळण ३५१ हेक्‍टर, एकतपूर -२१७ हेक्‍टर, मुंजवडी  १४३ हेक्‍टर, खानवडी – ४८४ हेक्‍टर , पारगाव १०३७ हेक्‍टर असे गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र आहे.

Loading...
You might also like