कोल्हापूर : शिवाजी पेठेत सशस्त्र हल्ला, एक जण गंभीर जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूल परिसरात एकावर सशस्त्र हल्ला झाला. शुक्रवारी रात्री दहा वाजता हा हल्ला झाला. या झालेल्या हल्ल्यात सुभाष पोपटराव देवकर (वय ४५ रा. जरगनगर) हा गंभीर जखमी झाला. सुभाष हा बोलू शकत नसल्यानं हल्ला कोणी केला याबाबतची माहिती आद्यप हाती लागली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष देवकर हा देवस्थान समितीकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने सकाळी सहा ते दुपारी दोन अशी ड्युटी केली. रात्री दहा वाजता निवृत्ती चौकाकडून तो फिरंगाई तालीमकडे जात होता. महाराष्ट्र हायस्कूलजवळ अज्ञाताने त्याला गाठले. त्याच्या डोक्यावर व तोंडावर असे दोन तीक्ष्ण हत्याराने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात सुभाष गंभीर जखमी झाला. तेथेच तो कोसळला. जोराचे वार झाल्याने रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. सुभाष हा बेशुद्ध आहे. अज्ञाताने तेथून पलायन केले. रस्त्यावरून जाणाऱ्या काहीजणांनी त्याला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवकर यांच्या मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर नेमकं काय घडलं याचा उलगडा होईल, हा हल्ला कोणी केला ? याबाबत पोलीस तपास करत आहेत, असे पोलिसांनी सांगितलं.