सांगलीत धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन  – सांगली-मिरज रस्त्यावरील भारती हॉस्पिटल समोर धारधार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. कमलेश दीपक आवळे (वय 32, रा. कृपामायीसमोर बेथेलहेमनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून कोयता, चाकू, सुरा अशी तीन धारदार हत्यारे जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्हयात शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यानी सांगली व मिरज विभागामध्ये पथके तयार केली. भारती हॉस्पीटलसमोरील एका पानटपरीवर एक तरूण हातात टॉवेल मध्ये धारदार शस्त्र घेवुन थांबला असल्याबाबत माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई चे आदेश दिले.

पथकाने तातडीने धाव घेऊन कमलेश आवळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता, एक सुरा व एक चाकु मिळाला. शस्त्राबाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक डगळे, वैभव पाटील, शशिकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.