Pimpri News : घरगुती गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 77 लाखाच्या मुद्देमालासह 19 जणांना अटक

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जीवनावश्यक घरगुती गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत 77 लाख 40 हजार 731 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील चिंबळी येथे रविवारी (दि.3) ज्ञानेश्वर महाराज व मोतीराम महाराज गॅस सर्व्हिसिंग स्टील होम रिपेरिंग सेंटर, स्वयंभू भारत गॅस येथे विनापरवाना घरगुती गॅसची चोरी करुन तो सिलेंडरमध्ये भरून साठवणूक व विक्री करण्यात येत होती. या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी दुकान मालक विलास भगवान खोडे (शिंदे) (वय 42 रा. चिंबळी गावठाण), टेम्पो चालक सतिश मनोहर परबत (वय-35 रा. चिंबळी चौक) आणि स्वयंभू गॅस एजन्सीचा मालक रविंद्र सातकर या तिघांना अटक केली.

pimpri-1

या कारवाईत 7 हजार140 रुपयांची रोकड, 7 लाख 10 रुपये किमतीचा टेम्पो, 4 लाख 55 हजार 226 रुपयांच्या 269 गॅस टाक्या यामध्ये 155 रिकाम्या गॅस टाक्या आणि 126 गॅसने भरलेल्या टाक्या असा एकूण 11 लाख 72 हजार 366 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

pimpri-2

सामाजिक सुरक्षा पथाने दुसरी कारवाई सोमवारी (दि.4) इंदोरी टोलनाक्याजवळ असलेल्या सोनू ढाब्याच्या पाठिमागे येलवाडी येथे केली. याठिकाणी काहीजण एच पी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमधून गॅसची चोरी करत असून हा गॅस टाकीत भरून याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. टँकर चालक रुपेश रामदुलार गौड (वय-25 रा. चेंबुर, मुंबई) मुख्य वितरक दिनेशकुमार लेखरात विष्णोई (जानी) (वय30 रा. येवलेवाडी, देहु मुळ रा. जशलाबाब जोधपुर राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या इतर 15 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

pimpri-3

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 30 लाख 96 हजार रुपये किमतीचा भरलेला कॅप्सूल गॅस टँकर, 25 लाख 85 हजार रुपये किमतीचे 2 महिंद्रा पिकअप, 4 बोलेरो पिकअप, 2 छोटा हत्ती, वॅगनार असे एकूण 10 वाहने, 2 लाख 55 हजार 500 रुपयांच्या भरलेल्या 140 गॅस टाक्या, 3 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 184 रिकाम्या टाक्या, 1 लाख 16 हजार 30 रुपयांची रोकड, 1 लाख 88 हजार 700 रुपयांचे 18 मोबाईल, 12 हजार 135 रुपयाचा इलेक्ट्रीक वजन काटा आणि पाईप कनेक्टर असा एकूण 68 लाख 68 हजार 365 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस हवालदार नितीन लोंढे, संदिप गवारी, संतोष असवले, पोलीस नाईक भगवंता मुठे, महेश बारकुले, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, पोलीस शिपाई योगेश तिडके, राजेश कोकाटे, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने योगीनी करचे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत सोरटे, पोलीस शिपाई सचिन नागरे, होमगार्ड मयुर ढोरे यांच्या पथकाने केली.