फिजिओ थेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाईल नंबर मिळवायचा, अश्लील व्हिडीओ कॉल करणार्‍या एरीक अंकलेसरियाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तो फिजिओ थेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाइल नंबर मिळवत असे. नंतर त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करत असे. थेरपीच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग करणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे. एरीक अंकलेसरिया (४५) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ता आहे.

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरीक हा स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून फिजिओथेरपी सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करून एका रुग्णाला गुप्तांगाची थेरपी हवी असल्याचे सांगायचा. त्यानंतर स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊन थेरपीदरम्यान महिलांचा मोबाइल नंबर मिळवायचा. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेला अश्लील व्हिडीओ कॉल करायचा, तर पकडले जाऊ नये, यासाठी प्रत्येक महिलेला एकदाच संपर्क साधायचा. त्यासाठी तो वेगळा मोबाइल नंबर वापरत होता. मात्र, एकाच दिवशी त्याने कोलकाता व मुंबई येथून दोन महिलांना कॉल केल्याने पोलिसांनी त्या दिवशीच्या विमान प्रवाशांची यादी तपासली. त्यात एरीक याचे नाव समोर आले.

दरम्यान, फिजिओथेरपी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. या व्यक्तीने तिला व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ कॉल केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा १चे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. या वेळी ज्या फोनवरून त्या महिलेला व्हिडीओ कॉल आला तो नंबर ठराविक वेळीच वापरला जात असल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. मिळालेल्या माहितीवरून रविवारी भांडुप येथून एरीक अंकलेसरिया (४५) याला राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितलं. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत गुन्हे दाखल आहेत. त्याने ५०० हून अधिक महिलांचा विनयभंग केल्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतल्या एका पॉक्सोच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.