पुणे-सोलापूर महामार्गावर कोयत्याच्या धाकाने लुटणारा जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावरून सोमवारी (दि. 8) पहाटे पादचाऱ्यास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लोखंडी कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

गणेश उर्फ आबा मधुकर माने (वय १९, रा. मोरेवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (ता. ०८ ) पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावरून पहाटे पादचाऱ्यास गणेश व त्याच्या दोन साथीदाराने लोखंडी कोयता दाखवून मारहाण केली. फिर्यादीकडील एक मोबाइल फोन व त्याच्याजवळील दोन हजार रुपये घेऊन गेल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली होती.

दरम्यान, हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, राम धोंडगे, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमिन, धीरज जाधव, दगडू वीरकर यांच्या पथकाला सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार ”गणेश माने हा त्या ठिकाणी गाडी चालवत होता. त्याच्याकडे लाल रंगाची दुचाकी आहे.” या माहितीच्या आधारे गणेश माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, गणेश माने व त्याच्या दोन साथीदारांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.