जत : पाटलाच्या वाड्यावर दरोडा टाकणे पडले महागात

जत : पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील खैराव येथील घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी चोप देऊन मुसक्या आवळल्या. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच दरोडेखोरांचा पाठलाग करुन तीघांना पकडण्यात यश आले तर दोनजण पळून गेले. हे थरारनाट्य मंगळवारी (दि.१९) रात्री खैराव गावात घडले. पकडण्यात आलेल्या आरोपींना जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तालुक्यात आत्तापर्यंत सहा दरोडेखोरांना पकडण्यात आले आहे.

प्रकाश शिवाजी चव्हाण (वय-२८ रा. इंदिरा नगर, जत), बादल बाळू शिंदे (वय-23 रा. खडकी, ता. मंगळवेढा) अशी संशयितांची नावे आहेत. तिघांपैकी एकजण पंधरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. तर त्यांचे दोन साथीदार पळून गेले. त्यांच्यावर जत पोलीसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तीन चाकू, मोटारसायकल (एमएच-10 5762) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खैराव येथील रामचंद्र विठ्ठल पाटील यांनी जत पोलीसांत तक्रार दिली आहे.

पाच दरोडेखोरांची टोळी रामचंद्र पाटील यांच्या वाड्यावर दरोडा टाकण्यासाठी मंगळवारी रात्री आली होती. दरोडेखोरांनी वाड्याच्या दरवाजाची कडी तोडून वाड्यात प्रवेश केला. कडी तोडण्याच्या आवाजाने पाटील यांना जाग आली. त्यांनी गावातील काही लोकांना फोन करुन याबाबत माहिती दिली. दरम्यान, दरोडेखोरांना थोपवताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. पाटील यांनी हा हल्ला चुकवल्याने ते बचावले. त्याचवेळी गावातील ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दलाने वाड्याला घेराव घातला. लोक जमा झाले असल्याचे लक्षात येताच दोन दरोडेखोर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तिघाजणांना पकडून त्यांचे हातपाय बाधून गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणण्यात आले. या ठिकाणी ग्रामस्थांनी पकडण्यात आलेल्या तिघांना चांगलाच चोप दिला.

या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांचे एक पथक खैराव गावात दाखल झाले. ग्रामस्थांनी पकडण्यात आलेल्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खैराव, येळवी, टोणेवाडी परिसरात चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याचा तपास अद्याप लागला नाही. त्यामुळे ग्रामस्थ दक्ष झाले असून त्यांनी चोरट्यांना पकडले आहे. चार दिवसापूर्वी जत शहरातही तीन दरोडेखोरांना नागरिकांनीच पकडून पोलीसांच्या हवाली केले होते.