विखे पाटलांच्या ‘त्या’ विधानामुळे काँग्रेसची पंचाईत

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये उपप्रवर्ग तयार करून स्वंतत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेसची पंचाईत झाली आहे. विखे पाटील यांनी अशाप्रकारचे विधान केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. राज्यातील भाजप सरकार निवडणुकीत फायदा उठविण्यासाठी आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांत चांगलीच जुंपली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ओबीसीमध्ये उपप्रवर्ग तयार करून मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी केली. अशा प्रकारे उपप्रवर्गाूतन आरक्षण दिले नाही, तर अखिल भारतीय प्रशासकीय सेवा व केंद्रीय सेवेत जाण्यासाठी त्याचा फायदा होणार नाही, तसेच राखीव प्रवर्गातून साधी ग्रामपंचायतीची निवडणूकही लढविता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. विखे-पाटील यांच्या या मागणीमुळे काँग्रेसची पंचाईत झाली.

विखे पाटील यांच्या या विधानामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दुसऱ्यादिवशी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेस आघाडी सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजाला व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. त्याच वेळी या अध्यादेशाच्या बाजूने भक्कम भमिका का मांडली नाही, शपथपत्र सादर करायला १८ महिने का लावले, असा सवाल करून आरक्षण देण्याच्या सरकारच्या हेतूबद्दल अशोक चव्हाण यांनी शंका व्यक्त केली.

मुस्लिमांच्या आरक्षणासाठी शिवसेना आग्रही, भाजपला अडचणीत आणण्याची चाल