चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार दाखल करणारे अशोक नवलेंची आत्महत्या

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय असणारे पंढरपूरचे विदूल पांडूरंग अधटराव हे भाजपचे माजी शहर अध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात सावकारीबाबत तक्रार दाखल करणारे अशोक नवले यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. यामुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे. तर यापूर्वी अधटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करून घरावर पोलिसांनी छापा टाकला होता.

अधिक माहितीनुसार, अशोक नवले यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तसेच अशोक नवले यांच्या पत्नीने आरोप करत म्हटले की, माझ्या पतीने विद्यूल अधवटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. २ दिवसांपूर्वी दादा फुंडकर हे घरी आले होते. त्यांनी दमदाटी केली होती. मग दोन दिवस ते तणावाखालीच होते. पहाटे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. विद्यूल अधवटराव आणि कुमार तारापूरकर यांनी माझ्या पतीला त्रास दिला. मागील वर्षभरापासून ते त्रास देत होते, असे अशोक नवले यांच्या पत्नीने म्हटले आहे.

तसेच, विद्युल अधटराव आणि कुमार तारापुरकर यांनीच अशोक नवले यांना मारहाण केल्याचा नवले कुटुंबीयांनी आरोप केला आहे. तर पोलिसांनी अशोक नवले यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अशोक नवले यांनी विदूल अधटराव यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये खाजगी सावकाराची तक्रार दाखल केली होती. तर तक्रार दाखल झालव्यानंतर विद्युल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी छापा टाकला होता. घराच्या झडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशेब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅक पासबुकसह २९ हजार ३४० रुपये जप्त केले होते. अधवटराव यांच्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांचीही पोलीस शोध घेत आहे. अवैध सावकारी प्रकरणातही कारवाई करण्यात आली आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे विद्युल अधटराव हे निकटवर्तीय आहे. यामुळे सावकारकीचा गुन्हा दाखल होऊनही तक्रारदार अशोक नवले ह्यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तर अशोक नवले यांच्या आत्महत्येमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.